राजकीय

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी बारामतीत खळबळ; शहर कार्यालयात आजी-माजी नगरसेवकांची दांडी, पक्षातील एकतेवर प्रश्नचिन्ह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी बारामतीत खळबळ; शहर कार्यालयात आजी-माजी नगरसेवकांची दांडी, पक्षातील एकतेवर प्रश्नचिन्ह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात

बारामती वार्तापत्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन राज्यभर उत्साहात साजरा होत असताना पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. शहरातील पक्ष कार्यालयात आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमाकडे अनेक आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाल्याची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षे पक्ष संघटनेवर असलेला त्यांचा प्रभाव, धाक आणि निर्णयक्षम नेतृत्वामुळे कार्यकर्ते एकत्र राहात होते. मात्र त्यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी अद्याप भरून न निघाल्याचे चित्र वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात अपेक्षित उपस्थिती न राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबतही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संघटनेतील एकता आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकेकाळी राष्ट्रवादीची अभेद्य ताकद मानल्या जाणाऱ्या बारामतीतच जर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी कार्यक्रमांपासून दूर राहत असतील, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
वर्धापन दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी दिसून आलेली ही अनुपस्थिती केवळ योगायोग आहे की पक्षातील वाढत्या अस्वस्थतेचे संकेत, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. बारामतीतील राष्ट्रवादीची एकजूट टिकवण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर उभे राहिले असल्याचे चित्र आहे.

Back to top button