बारामतीत पावसात भिजणाऱ्या पिलांसाठी चिमुकल्यांची माणुसकी; सीसीटीव्हीत कैद झाला हृदयस्पर्शी क्षण
पिलांसाठी काही चिमुकल्यांनी दाखवलेली संवेदनशीलता अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

बारामतीत पावसात भिजणाऱ्या पिलांसाठी चिमुकल्यांची माणुसकी; सीसीटीव्हीत कैद झाला हृदयस्पर्शी क्षण
पिलांसाठी काही चिमुकल्यांनी दाखवलेली संवेदनशीलता अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
बारामती वार्तापत्र
माणुसकी अजून जिवंत आहे, याची प्रचिती अनेकदा अनपेक्षितपणे येते. बारामतीतील राहुल पेंढारकर यांच्या घराजवळ घडलेली एक छोटीशी घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
कारण, जोरदार पावसात भिजणाऱ्या एका भटक्या कुत्रीच्या पिलांसाठी काही चिमुकल्यांनी दाखवलेली संवेदनशीलता अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारी ठरली.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे एका कुत्रीने जन्म दिलेल्या पिलांची दयनीय अवस्था झाली होती.
पावसाचे थेंब थेट अंगावर पडत असल्याने या निष्पाप जीवांचे हाल होत असल्याचे पाहून राहुल पेंढारकर यांनाही काहीतरी मदत करावी, असे मनोमन वाटत होते. मात्र, पिलांची आई अतिशय सावध असल्याने ती कोणालाही पिलांच्या जवळ जाऊ देत नव्हती.
दरम्यान, राहुल पुण्याला गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्या नजरेस एक वेगळीच गोष्ट पडली. पिलांच्या आसऱ्यासाठी वरून पत्रा टाकण्यात आलेला होता. हा पत्रा नेमका कोणी ठेवला, याबाबत त्यांनी घरच्यांना विचारणा केली. मात्र, कुणालाही त्याची माहिती नव्हती. कार्यालयातील मित्रालाही विचारले असता त्यानेही अनभिज्ञता दर्शवली.
या रहस्याचा उलगडा करण्यासाठी अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये दिसलेले दृश्य पाहून सगळेच भारावून गेले. परिसरातील काही लहान मुलांनी पावसात भिजणाऱ्या त्या पिलांची अवस्था पाहून स्वतःहून पुढाकार घेतला होता. पिलांना पावसापासून संरक्षण मिळावे, त्यांच्यावर पाणी पडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या परीने पत्रा आणून त्यांच्यावर आसरा उभा केला होता.
या निरागस कृतीने एक मोठा संदेश दिला. दया, करुणा आणि माणुसकी यांना वय, जात, धर्म किंवा कोणत्याही सीमांचे बंधन नसते. ज्या वयात अनेक मुले खेळण्यात रमलेली असतात, त्या वयात या चिमुकल्यांनी मुक्या जीवांचे दुःख ओळखून त्यांना मदतीचा हात दिला.
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी होत चाललेल्या जगात हा प्रसंग मनाला उभारी देणारा आहे. पावसापासून काही पिलांचे रक्षण करण्यासाठी उभारलेला तो साधासुधा पत्रा नव्हता, तर तो होता संवेदनशील मनांचा, जिवंत माणुसकीचा आणि निरागस प्रेमाचा एक सुंदर आसरा. अशा चिमुकल्यांमुळेच समाजातील चांगुलपणावरचा विश्वास अधिक दृढ होतो.






