बारामतीत बनावट पोलिसांचा धक्कादायक कारनामा; सुरक्षेच्या नावाखाली १.२५ लाखांचा गंडा
पोलीस’ म्हणाले आणि विश्वास बसला; डिक्की उघडताच १.२५ लाखांची फसवणूक उघड

बारामतीत बनावट पोलिसांचा धक्कादायक कारनामा; सुरक्षेच्या नावाखाली १.२५ लाखांचा गंडा
‘पोलीस’ म्हणाले आणि विश्वास बसला; डिक्की उघडताच १.२५ लाखांची फसवणूक उघड
बारामती वार्तापत्र
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून गस्त व तपासणी सुरू असल्याचा गैरफायदा घेत बनावट पोलिसांनीच नागरिकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत समोर आला आहे. ‘आम्ही भरारी पथकातील पोलीस असून गस्त सुरू आहे,’ अशी बतावणी करीत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका व्यक्तीला अडवून त्याच्याकडील सोन्याची चेन व अंगठी लंपास केली.
ही घटना १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास टी.सी. महाविद्यालयाजवळील जिमखाना गेट, व्हिल कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘आम्ही भरारी पथकातील पोलीस आहोत…’
याबाबत विकास श्रावण बगाडे (रा. शरदनगर, तांदूळवाडी रोड, बारामती) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बगाडे हे टी.सी. महाविद्यालयात ग्रंथालय परिचर म्हणून काम करतात.
१४ सप्टेंबर रोजी ते महाविद्यालयातून व्हिल कॉलनीच्या दिशेने जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडविले. त्यातील पुढे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते, तर मागे बसलेल्या व्यक्तीने चेहऱ्याला रुमाल बांधला होता.
या दोघांनी आपण भरारी पथकातील पोलीस असून गस्त सुरू असल्याचे सांगितले. गणपती उत्सवाच्या काळात चोरी-मारी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तपासणी सुरू असल्याचे सांगत त्यांनी बगाडे यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची चौकशी केली.
पोलिस असल्याचा विश्वास… अन् सोन्यावर डल्ला!
समोरचे दोघे पोलीस असल्याचा विश्वास बसल्याने बगाडे यांनी त्यांच्याकडे मोबाईल, घड्याळ, महाराष्ट्र बँकेचे एटीएम कार्ड, दोन तोळे वजनाची सोनसाखळी आणि अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी दिली.
संशयितांनी या वस्तू रुमालात बांधून त्या बगाडे यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवत असल्याचे भासविले. मात्र, त्यानंतर दोघेही दुचाकीवरून वेगाने निघून गेले.
डिक्की उघडताच फसवणूक उघड
काही अंतरावर गेल्यानंतर बगाडे यांना संशय आला. त्यांनी दुचाकी थांबवून डिक्की उघडली असता मोबाईल, घड्याळ आणि एटीएम कार्ड डिक्कीत आढळले; मात्र सोन्याची चेन आणि अंगठी गायब होती.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकारात एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
खाकीचा गैरवापर; नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज
या घटनेमुळे पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार किती गंभीर ठरू शकतो, याकडे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात ‘तपासणी’, ‘गस्त’, ‘सुरक्षेची खबरदारी’ अशा कारणांचा वापर करून कोणी मौल्यवान वस्तू मागितल्यास नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीची माहिती आणि संशयितांची ओळख याबाबत तपासातून काय समोर येते, याकडे लक्ष लागले आहे.






