शेटफळ तलावासाठी वीर धरणाचे पाणी सुटले! जलसंपदामंत्र्यांचे लेखी आदेश; १० गावांना मोठा दिलासा
हर्षवर्धन पाटलांच्या पाठपुराव्याला यश!

शेटफळ तलावासाठी वीर धरणाचे पाणी सुटले! जलसंपदामंत्र्यांचे लेखी आदेश; १० गावांना मोठा दिलासा
हर्षवर्धन पाटलांच्या पाठपुराव्याला यश!
इंदापूर : प्रतिनिधि
शेटफळ तलाव लाभक्षेत्रातील दहा गावांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून पाण्याचे आवर्तन न मिळाल्याने निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वीर धरणातून शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्यात आले आहे. जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या लेखी आदेशानंतर मंगळवारी (ता. २९) वीर धरणाचा व्हॉल्व पुन्हा उघडण्यात आला. हे पाणी बुधवारी (ता. ३०) शेटफळ तलावात पोहोचण्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील दहा गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तसेच नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे शेटफळ तलावात पाणी सोडण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेटफळ तलावाच्या लाभक्षेत्रातील दहा ग्रामपंचायतींचे ठराव आणि निवेदन जलसंपदामंत्र्यांकडे सादर करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला वीर धरणातून शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिले.
पाणी तलावापर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा सक्रिय
शेटफळ तलावात पाणी सुरळीतपणे पोहोचावे, यासाठी पुणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना नीरा डावा कालव्यावर पाठवून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कालव्यातून सोडलेले पाणी योग्य पद्धतीने शेटफळ तलावापर्यंत पोहोचते की नाही, यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पाणी सोडण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी तलावापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे.
दहा गावांना मोठा दिलासा
शेटफळ तलावात पाणी पोहोचल्यानंतर लाभक्षेत्रातील दहा गावांमधील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कृषिमंत्र्यांसह अधिकाऱ्यांशीही चर्चा
शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशीही चर्चा झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
आवर्तन संपल्यानंतर पुन्हा उघडला वीर धरणाचा व्हॉल्व
दरम्यान, नीरा डावा कालव्याचे नियमित आवर्तन सोमवारी रात्री संपल्याने वीर धरणाचा व्हॉल्व बंद करण्यात आला होता. मात्र, शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्याचे जलसंपदामंत्र्यांचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी दुपारी व्हॉल्व पुन्हा उघडण्यात आला.
व्हॉल्व उघडताच शेटफळ तलावाच्या दिशेने पाण्याचा प्रवाह सुरू झाला. गेल्या पाच महिन्यांपासून आवर्तनाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभक्षेत्रातील दहा गावांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.






