तहसीलदार बनसोडेंच्या विरोधात २५ रोजी जनआक्रोश मोर्चा
कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभाराचे आरोप; निलंबन आणि बदली होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा
तहसीलदार बनसोडेंच्या विरोधात २५ रोजी जनआक्रोश मोर्चा
कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभाराचे आरोप; निलंबन आणि बदली होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा
इंदापूर, –
तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या विरोधात येत्या २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. तहसीलदारांचे निलंबन आणि इंदापूरमधून बदली होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी, पीडित, शोषित तसेच विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री डॉ. आकाश कांबळे, ॲड. आशुतोष भोसले, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे आदींनी केले. शनिवारी (दि. २१) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

तहसील कार्यालयातील विविध कामांसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत असल्याचा, शेतकऱ्यांच्या रस्त्यांसंदर्भातील प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात असल्याचा, तसेच मुरूम, वाळू आणि खडीच्या कथित अवैध व्यवसायांना अभय दिले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याशिवाय अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची कामे वेळेत होत नसून, त्यांना कार्यालयात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचेही वक्त्यांनी सांगितले. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भिगवण येथील राजस्व अभियानादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा छायाचित्र लावण्यात न आल्याच्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना दमदाटी केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. तहसीलदारांच्या कार्यपद्धतीविरोधातील तक्रारींना जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा फेटाळून लावत, हा लढा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून कथित भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महसूल मंत्र्यांच्या आदेशानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. मात्र, केवळ चौकशीपुरते मर्यादित न राहता संबंधित तहसीलदारांचे निलंबन करून त्यांची इंदापूरमधून बदली करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागण्यांसाठी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विक्रम शेलार, राहुल सोनवणे, दादासाहेब सोनवणे, ललेंद्र शिंदे, नितीन सरवदे, सुनील सोनवणे, गणपत सरवदे, अमर राऊत, अभिजित गायकवाड, दत्तात्रय सरवदे, एकनाथ सरवदे आदी उपस्थित होते.






