आपला जिल्हा

इंदापुरात 30 वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन,पर्यावरणप्रेमींकडून अभिनंदन

या वृक्षाला पुन्हा नवीन पालवी फुटून तो पूर्वीप्रमाणे बहरून येईल..

इंदापुरात 30 वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन,पर्यावरणप्रेमींकडून अभिनंदन

या वृक्षाला पुन्हा नवीन पालवी फुटून तो पूर्वीप्रमाणे बहरून येईल..

इंदापूर,आदित्य बोराटे – 

जून महिन्यात आलेल्या वादळामुळे मुळासकट उन्मळून पडलेल्या सुमारे 30 वर्षीय जुन्या वडाच्या झाडाला नवजीवन देण्यात नगरपरिषदेच्या उद्यान विभागाला यश आले आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींकडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असतानाच,नगराध्यक्ष भरत शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अक्षय सूर्यवंशी आणि पर्यावरण प्रेमींनी एक वडाचं झाड वाचवून नवा आदर्श घालून दिला.

अकलूज रस्त्यालगत असलेला अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा वडाचा वृक्ष पडल्याची माहिती मिळताच नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून हा वृक्ष संत तुकाराम महाराज पालखी तळ परिसरात पुनर्प्रस्थापित करण्यात आला. विशेष यंत्रसामग्रीच्या साह्याने वृक्ष सुरक्षितपणे हलवून नव्या ठिकाणी लावण्यात आला.

या उपक्रमावेळी नगरसेवक अक्षय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संपूर्ण कामावर लक्ष ठेवले. योग्य निगा आणि संवर्धनामुळे या वृक्षाला पुन्हा नवीन पालवी फुटून तो पूर्वीप्रमाणे बहरून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, इंदापूर नगरपरिषदेच्या इतिहासात इतक्या मोठ्या वृक्षाची पुनर्लागवड करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या उपक्रमासाठी वृक्षप्रेमी सामाजिक संस्था परिवाराचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते धरमचंद लोढा, बाळासाहेब उंबरे, चैतन्य वाघमोडे, सौरभ उंबरे, संस्कार पलंगे, आर्यमान गाणबोटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.नगरपरिषद उद्यान विभागाचे अशोक चिंचकर, अंबादास नाळे, अल्ताफ पठाण यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.

पर्यावरण संवर्धनासाठी समाज आणि प्रशासन एकत्र आल्यास पडलेल्या वृक्षालाही नवजीवन देता येते, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Back to top button