इंदापूर

इन्स्टाग्राम चॅटिंगच्या वादातून घरावर जमाव; चारचाकी जाळल्याचा आरोप, महिलेची न्यायासाठी आर्त हाक

पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप

इन्स्टाग्राम चॅटिंगच्या वादातून घरावर जमाव; चारचाकी जाळल्याचा आरोप, महिलेची न्यायासाठी आर्त हाक

पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप

इंदापूर;प्रतिनिधि

इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे इन्स्टाग्राम चॅटिंगच्या कथित वादातून एका महिलेच्या घरावर 40 हून अधिक जणांचा जमाव चालून आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणात अज्ञातांनी चारचाकी वाहन पेटवून दिल्याचा आरोपही संबंधित महिलेने केला असून, पोलिसांकडून अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.

आदिवासी पारधी समाजातील सविता काळे यांनी पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम चॅटिंगच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर 40 हून अधिक जणांचा जमाव त्यांच्या घरात घुसला आणि त्यांना तसेच त्यांच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, 6 जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या चारचाकी वाहनाला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेची माहिती तातडीने डायल 112 वर देण्यात आली होती. पोलिस घटनास्थळी आले; मात्र त्यानंतर केवळ अर्ज घेण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा काळे यांनी केला.

पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. “मला न्याय द्या, आमचा जीव वाचवा,” अशी आर्त हाक सविता काळे यांनी दिली आहे.
या प्रकरणामुळे डिकसळ परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button