
शहा ग्लोबल स्कूलमध्ये उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…
इंदापूर –
शहा ग्लोबल स्कूलमध्ये शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या विकासाचा प्रवास विविध क्षेत्रांतील सादरीकरणातून प्रभावीपणे उलगडला.
अर्थव्यवस्था, शेती, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगार या क्षेत्रांत स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली प्रगती विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून दाखविली. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्रण या कार्यक्रमातून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीराज भरणे यांनी शिक्षणव्यवस्थेतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा शिक्षण क्षेत्रात योग्य व प्रभावी वापर याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोजगारनिर्मिती आणि समाजाच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबतही त्यांनी विचार व्यक्त केले.
व्यवस्थापन समितीचे सदस्य अंगद शहा यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व स्पष्ट करताना मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करण्यासोबतच जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात K2 विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीत, K1 विद्यार्थ्यांचे भाषण, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीतावरील नृत्य, इयत्ता दुसरीचे ‘Pom-Pom Dance’, इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे लेझीम सादरीकरण तसेच इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध परेड झाली. या सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी यादव यांनी केले. रीतु शुक्ला यांनी आभार मानले. यावेळी मुकुंद शहा, सौ. अंकिता शहा, नगराध्यक्ष भरत शहा, सौ. वैशाली शहा, डॉ. संजय शहा, अंगद शहा, सौ. रुचिरा शहा यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षक आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे नियोजन आणि व्यवस्थापनाचे सहकार्य यामुळे शहा ग्लोबल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा देशभक्ती, शिस्त, संस्कार आणि नवभारताच्या विकासाची प्रेरणा देणारा ठरला.






